Showing posts with label श्री क्षेत्र कुणकेश्वर. Show all posts
Showing posts with label श्री क्षेत्र कुणकेश्वर. Show all posts

Monday, 4 March 2013

श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...


श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...

अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी... कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर... देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्‍याशी असणार्‍या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्‍या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर.... कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र...
kunkeshwar yatra
या मंदिरासंबधी दोन दंतकथा सांगीतल्या जातात.

१) एका गरीब ब्राम्हणाची गाय दुध कमी देउ लागली. तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले. कुणकेश्वर येथील शंभु महादेवाची पिंडी स्वयंभु असून पूर्वी ती कनक वृक्षांच्या घनदाट अरण्याने वेढलेली होती. ब्राम्हणाची गाय आपल्या मालकाला दूध न देता  एका विवक्षित जागी जाउन ती गाय पान्हा सोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्या गाईला बेदम जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला.पण गाय निसटून पळाली व त्या प्रहाराचा पाषाणावर आघात झाला आणि त्यातून भ़ळाभ़ळा रक्त येउ लागले. ते पाहून आश्चर्याने भयचकीत झालेल्या ब्राम्हणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली. हे स्वयंभू शिवलिंग असल्याची खात्री झाली. त्यानंतर तो ब्राम्हण त्या पाषाणाला शरण गेला व तेव्हापासून तो नित्यनियमाने या पाषाणाची पूजाअर्चा व दिवाबत्ती करू लागला आजही या शिवलिंगावर या घावाची खुण दाखविली जाते.

२) एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळात सापडला. आगतिक बनलेला व्यापारी परमेश्वराची करूणा भाकू लागला. तेवढयात त्याला पूर्वेकडे शांतपणे तेवणार्‍या दिव्याचा प्रकाश दिसला. दिलासा देणार्‍या त्या नंदादीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसा खर्चुन जीर्णोद्धार करीन असं त्यानं मनोमन ठरवलं. किनार्‍यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला. हिंदूंच हे छोटं मंदिर होतं या शिवायलायाचा त्याने जीर्णोद्धार केला. तीन वर्षे आणि द्रव्य खर्चून त्यानं हे काम पुरं केलं देवाच्याच पायाशी जागा मिळावी म्हणून त्यानं शिखरावर चढून खाली उडी मारली व प्राणत्याग केला. त्याचं स्मारक कुणकेश्वराच्या उत्तरेस आहे.

हिच दंतकथा कुणकेश्वरचा इतिहास म्हणून अलिकडच्या काळापर्यत सांगितली जात होती. परंतु जसजशी कुणकेश्वरची प्रसिद्धी वाढत गेली तशी अभ्यासकांची दृष्टी येथे पडली. प्राचीन काळी जेव्हा मुसलमानी सत्ता हिंदुंना मुळासकट उचकटण्याचा प्रयत्न करित होत्या त्या काळी एक मुस्लीम व्यक्तीकडुन हिंदु मंदिर कसे काय उभारण्यात आले. त्यामुळे हि दंतकथा अभ्यासकांना खटकण्यासारखीच होती. त्यामुळे कुणकेश्वरच्या इतिहासाचा अधिक चौकसपणे अभ्यास होऊ लागला.

१९६० च्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकीत्सक दृष्टीने पाहणी केली. आणि थडगे म्हणून दाखवली जाणारी इमारत हि, हिंदु मंदिराची असुन आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे साधार पुराव्यानिशी दाखवून दिले. अशाप्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासातील सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली. त्यानंतर कोंकणातील गावह्राटी पुस्तकाचे लेखक श्याम धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक रणजित हिर्लेकर या अभ्यासकांनी ही याविषयी संशोधन केले असुन, "कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापार्‍याने बांधले नसुन हे मंदिर कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांसारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे. आणि थडगे समजले जाणारी वास्तू हि एक बाटवलेले शिवमंदिर आहे." असा निष्कर्श सर्वांनी मांडला आहे. अरब व्यापार्‍याची कथा हि वारंवार आक्रमण करणार्‍या मुसलमानी सरदारांच्या डोळयात धूळ फेकण्यासाठीच केलेली एक व्यूहरचना होती. मंदिराच्या रक्षणासाठीच मुस्लिम व्यापाराने हे मंदिर बांधल्याचे कथानक मुद्दामच पसरविण्यात आले. पण तीच दंतकथा होऊन आपल्या पुढे उभी आहे. पनवेलजवळच्या कणकेश्वर मंदिराच्या बांधकामाविषयी देखील कुणकेश्वर मंदिरासारखीच अरबी व्यापार्‍याची कथा सांगीतली जाते. तसेच राजापुरच्या अंजनेश्वर मंदिराच्या बांधकामाविषयी देखील हिच कथा सांगितली जाते. अनेक ठिकाणी मंदिरांच्या रक्षणासाठी अशी थडगी उभारली गेली आहेत. रामेश्वर मंदिराच्या सभामंडपालगत दिपमाळेच्या रांगेत असेच एके बनावट थडगे आहे. ही सर्व सुलतानी तडाख्यातून मंदिरे वाचविण्यासाठी केलेली एक व्यूहरचना होती.

कथा कुणकेश्वर मंदिराच्या विध्वंसाची व जिर्णोद्धाराची

या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम वेळोवेळी हिंदू राजांच्या काळात झालेले आहे. पण जुन्या कागदपत्रांच्या सहाय्याने निश्चित होणारा मंदिराचा जिर्णोद्धार हा शिवकाळातील आहे.

छत्रपती शिवरायांच्या काळात सुलतानी आक्रमणांचा उपद्रव पोचलेल्या असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार झालेला आहे. सुलतानी आक्रमणाने पिचलेल्या भारतात शिवरायांच्या पराक्रमाने पुन्हा एक परिवर्तनाची लाट आली. आणि मग आपल्या परमप्रिय दैवतांची पुनर्स्थापना करण्याची ओढ या मातीतील माणसाला होऊ लागली. कुणकेश्वर मंदिराचा झालेला जिर्णोद्धारही याच काळातील आहे. हा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा. आजपासून जवळजवळ ३00 वर्षाँपूर्वीचा. शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचे सांगितले जाते. कुणकेश्वर मंदिर हे काहीसे एका बाजुला असल्यामुळे व अतिशय दुर्गम असणार्‍या या भूप्रदेशामुळे सुलतानी आक्रमकांच्या आसुरी तांडवापासून काहीसे सुरक्षित राहीले. तरी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर व औरंगजेब दक्षिणेत उतरल्यानंतर या मंदिराला उपसर्ग पोहोचला होता असे इतिहास सांगतो.

त्याकाळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणार्‍या नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता. नारो निळकंठांची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती. औरंगजेबाचा पुत्र शहाआलम हा घाट उतरुन या तळकोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे एक डोळ्यांत भरणारे मोठे तिर्थक्षेत्र होते. त्यामुळे कुणकेश्वर मंदिराला शहाआलम त्रास देईल अशी भिती नारो निळकंठांना वाटू लागली. त्यावेळी नारो पंडितांनी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी नक्कीच काहीतरी योजना केली असणार. त्यांनी जी उपाययोजना केली तीच ही अरबी व्यापाय्राची दंतकथा होय.! असे मत श्री शाम धुरी यांनी मांडले आहे.

कुणकेश्वर यात्रेसाठी जाण्याकरीता

जवळील रेल्वे स्थानक - कणकवली. कणकवलीहून स्थानकाहून देवगड त्यानंतर देवगडहून कुणकेश्वरला येण्यासाठी आपल्या शासनाच्या बर्‍याच बसेस आहेत. यात्रे दरम्यान भक्तांसाठी जादा गाडयांची सोय केलेली असते. कणकवलीहुन देवगड हे अंतर ५५ किलोमीटर आहे. तर देवगडहून  कुणकेश्वर हे अंतर १८ किलोमीटर आहे.

मुंबईहून यायचे झाले तर तर महाराष्ट्र परिवहनाच्या गाडया देवगड मार्गे कुणकेश्वरसाठी आहेत. तसेच खाजगी वाहने मोठया प्रमाणावर आहेत.

विमानतळ - पणजी (गोवा)

चला मग जाऊया कुणकेश्वर यात्रेला

अधिक माहितीसाठी विजीत  करा : www.travelthemes.in